जुने सोन्याची दागिने देऊन, नवीन पध्दतीचे सोन्याची दागिने बनवून घ्या सांगत, सोनार फरार ? सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जुने सोन्याची दागिने देऊन, नवीन पध्दतीचे सोन्याची दागिने बनवून घ्या सांगत, सोनार फरार ?
दिनांक ११ मे
सफाळे ( एच. लोखंडे ) लग्न सराईचा सिझन असल्याने, अनेकांना आपल्या मुलगा अथवा मुलींच्या लग्नासाठी दागदागिने बनविण्याची घाई असते. या संधीचा फायदा घेत. सफाळे पुर्व पो. उंबरपाडा. ता. जि. पालघर येथील, गणेश ज्वेलर्सचे ( सफाळे पुर्व रेल्वे फाटक समोर ) मालक १) कान्हाराम दलाराम चौधरी - सज्ञान रा. विरार वेस्ट ता. वसई (ई )जि. पालघर. २) दिनेश शांतीलाल ढोलकिया - सज्ञान रा. बोळींग ता. वसई जि. पालघर. यांनी आपल्या गणेश ज्वेलर्स च्या दुकानात, लग्न सराईत निमित्ताने सोने खरेदी विक्री साठी येणाऱ्या ग्राहक यांना, जुन्या पध्दतीचे सोन्याची दागिने त्यांना घेऊन नवीन पध्दतीचे ( फॅशन ) दागिने बनवून देतो सांगत, एका पेक्षा जास्त ग्राहकांना लाखो किंवा करोडो रूपयांचा गंडा घातल्याचा पोलीस तपासा अंती आढळून येत असल्याचे दिसून येणार आहे.
सदर फसवणुकीच्या संदर्भात श्रीमती. मनिषा धनाजी पाटील वय वर्षे ४३ व्यवसाय शेती रा. कांद्रेभुरे पो. टेंभीखोडावे ता. जि. पालघर यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नुकसान, जानेवारी २०२३ ते २७ एप्रिल २०२३ या काळा दरम्यान, यांनी आपले जुन्या सोन्याची परंतु वापरात असलेली गंठण अंदाजे वजन ०६ तोळे ०७ ग्राम ( अंदाजे किंमत ३,२५,०००/- रूपये ) रोख रक्कम २,००,०००/- रूपये असा एकुण ५,२५,०००/- रूपये किमतीचे एवज नवीन दागिने बनविण्यासाठी गणेश ज्वेलर्सचे मालक, कान्हाराम चौधरी व हितेश ढोलकिया यांच्या हवाली केले होते. त्यानंतर सदर गणेश ज्वेलर्सचे मालक यांच्या कडून योग्य प्रतिसाद न मिळता सदर दुकान बंद आढळून येत असल्याने दिनांक १० मे २०२३ रोजी, सफाळे पोलीस ठाणे. ता. जि. पालघर येथे रितसर तक्रारदार श्रीमंती मनिषा धनाजी पाटील यांनी गुन्हा रजि. क्रमांक ४६ / २०२३ प्रमाणे व भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६,४०१,४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्ह्यांचे स्वरूप पाहता, श्री. बाळासाहेब पाटील- पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमती - निता पाडवी पालघर विभागीय पोलीस अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली, सफाळे पोलीस ठाणे, प्रभारी पोलीस अधिकारी श्री. अमोल गवळी - स. पो. निरीक्षक यांच्या सहकार्याने श्री. एम. आर. बेलकर- पो. उपनिरीक्षक तपासणी अधिकारी पुढील तपास करीत आहेत. सदर घटना स्थळास श्री अमोल गवळी साहेब यांनी भेट दिली असून, सदर गणेश ज्वेलर्स दुकान धारक मालकांच्या जाळ्यात अनेक ग्राहक फसलेले असून, सदर फसवणूक हि लाखो रुपयांची नाही तर करोडो रूपयांची हि असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अजून अनेक फसवणूक झालेले ग्राहक सफाळे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.