वसई मंडलाच्या अधीक्षक अभियंता पदी संजय खंदारे रुजू
वसई मंडलाच्या अधीक्षक अभियंता पदी संजय खंदारे रुजू
वसई:-(प्रतिनिधी) दि.११ मे २०२३
महावितरणच्या वसई मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार संजय खंदारे यांनी नुकताच स्वीकारला. नाशिक परिमंडलाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणून यापूर्वी ते कार्यरत होते. अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची बदलीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल विषयातील बी.टेक पदवी त्यांनी संपादित केली आहे. तर याच विषयातील पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी नागपूरमधून तर वकिलीची पदवी पुणे येथून पूर्ण केली आहे. तत्कालीन राज्य वीज मंडळात ऑगस्ट १९९९ मध्ये ते कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता ही पदे थेट भरतीच्या माध्यमातून मिळवली. मुख्य कार्यालय असलेले मुंबईतील प्रकाशगड, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी विविध पदांवर काम करताना कामाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. महावितरणच्या तांत्रिक संगणकीय प्रणालीचे (ईआरपी) पॉवर सिस्टिम मोड्युल बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रक्टिसेस’ या वीज वितरण क्षेत्रात पायाभूत आराखड्यावरील नामांकीत पुस्तकाचे ते लेखक आहेत. वसई मंडलात रुजू झाल्यानंतर ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.