शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार?

*शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार?*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना गट (शिवसेना उद्धव ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत सोबत बोलणी झाली असून मुंबई महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर  यांनी आज मुंबईत दिली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी नोटबंदी निकालापासून ते राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, आमच्यात आणि शिवसेनामध्ये बोलणी झाली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र जाण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा खुला विरोध आहे. तर, काँग्रेसचा छुपा विरोध आहे. पुणे आणि पिंपरी  चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोबत घेते का? हे बघावं लागेल असेही त्यांनी म्हटले.

*जागा वाटपाचे सूत्र काय?*

प्रकाश आंबडेकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन  आघाडीमधील जागा वाटपाबाबत ही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा करण्याआधी आम्ही ८३ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता, चर्चेनंतर शिवसेना आम्हाला जेवढ्या जागा सोडेल त्यावर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पाडली होती.

*शिवसेनेसोबत आमची युती स्थिर राहू शकते*

शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपावरून कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारखाली नाही. त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना युती स्थिर दिसत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आता शिवसेना काही कारणास्तव निर्णय घेऊ शकली नाही, तरच मला यामध्ये अडचण वाटते. बऱ्याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. त्यांना उपमुख्यमंत्री म्हंटलं तर कमीपणा वाटतो म्हणून त्यांचे लक्ष्य मुख्यमंत्रीपदाचे आहे. त्यामुळे यासाठी देवेंद्र फडणवीस काय नियोजन करणार यावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

Popular posts from this blog

काल्हेर मधील सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमुळे नागरिकांन मध्ये घबराट!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर